कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसथांब्याची अवस्था दयनीय झाली आहे. बसथांब्यावर फलकच नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी महानगरपालिकेच्या बसची सुविधा उपलब्ध असली, तरी संबंधित बसथांब्याची अवस्था पाहता हा बसथांबा अक्षरशः बेवारस असल्याचे चित्र आहे.
महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात बसथांब्यांची दुरवस्था कायम आहे. परिवहन विभागाच्या सभापतींनी एकदा मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बसथांब्यांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती पाहावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
एकीकडे बसथांब्यांचे फलक गायब झालेले दिसतात, तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या जाहिरातींनी बसथांब्यांवरील जागा व्यापल्याने नेमका कोणता बसथांबा आहे, हेच प्रवाशांना समजत नाही. त्यामुळे विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी योग्य ठिकाण शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
केवळ परिवहन विभागाचे पदाधिकारी बदलून प्रश्न सुटणार नाही. कोल्हापूरच्या परिवहन व्यवस्थेत प्रत्येक पातळीवर बदल करण्याच्या मानसिकतेसह प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. बसथांब्यांवर आवश्यक फलक, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि प्रवाशांना स्पष्ट माहिती उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.





