कोल्हापूर – दुसऱ्या महायुद्धाच्या नरसंहारात पोलंड वासियांना मदतीचा हात देणारा भारत हा पहिला देश आणि कोल्हापूरमधील छत्रपती हे पहिले राजे होते, अशी कृतार्थ भावना पोलंड देशाच्या संसद सदस्या आणि पोलंड – भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांनी व्यक्त केली आहे. पोलंडच्या संसदीय शिष्ठमंडळाने कोल्हापूरला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरातील वळीवडे याठिकाणी पोलंड वासियांसाठी उभारण्यात आलेल्या कॅम्पच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्याचबरोबर त्याकाळी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तू आणि छायाचित्र असणाऱ्या वळीवडे येथील संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली.
यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते शिष्टमंडळातील सर्वांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी, दुसऱ्या महायुद्धातील १९४२ ते १९४८ दरम्यानच्या इतिहासाला उजाळा दिला. ही सध्या तिसरी पिढी असून आजही तितकाच जिव्हाळा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण पोलंड आणि कोल्हापूरकर यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, हा फक्त समारंभ नाही तर त्यावेळच्या ऐतिहासिक पर्वाची नव्याने सुरुवात असल्याचे सांगितले. पोलिश नागरिक यांच्याशी असलेले हे ऋणानुबंधाचे नाते सर्व जगापुढे आणण्याची जबाबदारी आपली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढं घेऊन जाण्याची आणि त्यांचा वारसा जिवंत ठेवण्याची संधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस कुटुंबाच्या वंशज अपेक्षा निरंजन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मीन, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, बाळ पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



