राजर्षी शाहू महाराजांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी

कोल्हापूर –  समाजसुधारक, शिक्षणप्रसारक आणि लोक कल्याणकारी राजा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य आजही देशासाठी प्रेरणादायी आहे. १८९४ ते १९२२ या काळात राज्य करताना त्यांनी सामाजिक न्याय आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. वंचित आणि मागास समाजासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यासोबतच जातिभेदाविरोधात ठाम भूमिका घेतली. शिक्षणाचा प्रसार, महिला शिक्षणाला प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले.

शाहू महाराजांचे कार्य केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, सामाजिक, समता आणि न्यायाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संपूर्ण भारतासाठी ते आदर्श आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने  त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने  सन्मानित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे मानकरी लालासो पोवार यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.

या मागणीसाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात  येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी १५ ऑगस्टला ग्रामसभांमध्ये आवाजी मतदानाने ठराव मंजूर करण्याचे आवाहन ग्रामीण भागातील नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच लोकसभा आणि राज्यसभेचे  खासदार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आगामी काळात सर्व ठरावांच्या प्रती दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात सादर करण्यात येणार आहेत. शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रीय योगदानाला उचित सन्मान मिळवून देण्यासाठी या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Scroll to Top