कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष.. सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची ओढ… अशा देशभक्तीपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रेक २०२६ च्या ३३ व्या आवृत्तीचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ करण्यात आला.
एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठ परिसरातील एनसीसी भवनमध्ये ध्वजप्रदर्शन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी एनसीसी ग्रुप मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर आणि एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे उपमहासंचालक ब्रिगेडियर मनीष शर्मा, सेना मेडल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पहिल्या तुकडीच्या ध्वजप्रदर्शन सोहळ्यात एकूण सात सहयोगी एनसीसी अधिकारी आणि २३६ छात्रांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली संचालनालयाचे १०२, गुजरात संचालनालयाचे १०२ आणि महाराष्ट्रातील अमरावतीचे २६ छात्र सहभागी झाले आहेत. विविध राज्यांतील युवकांचा सहभाग हे या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या ट्रेकचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर छात्रांमध्ये साहसी वृत्ती, नेतृत्वगुण, शिस्त, संघभावना आणि राष्ट्रीय एकात्मता रुजवण्यावरही भर दिला जाणार आहे. मोहिमेदरम्यान छात्रांना सह्याद्रीच्या आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. विविध राज्यांतील छात्र एकत्र सहभागी झाल्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि विविधतेतून एकतेचा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे.
यावेळी कर्नल अनूप आर, कर्नल मानस दीक्षित, कर्नल प्रशांत सिंह, कर्नल विक्रम नलावडे, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आणि लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील यांच्यासह एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




