कोल्हापूर – सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रात वनवा प्रतिबंध आणि वनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने उखळू पैकी आंबाईवाडा, धनगरवाडा येथे वनविभागाच्यावतीने जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली.
यावेळी वनव्यामुळे जंगलातील झाडे, लहान रोपे, वन्यप्राणी, पक्षी, जैवविविधता तसेच नैसर्गिक जलस्रोतांचे होणारे नुकसान याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी भविष्यात जंगलात कोणत्याही प्रकारे आग लावणार नाही, तसेच इतरांकडून आग लावण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देऊ, तसेच वनवा प्रतिबंधासाठी वनविभागाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांनी दिली.
जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून स्थानिक नागरिकांचाही त्यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असणे आवश्यक आहे. वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून वनवा प्रतिबंधाचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल, असे यावेळी नमूद करण्यात आले.
या बैठकीस आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर, उदगिरीचे वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक सुभाष वसावे, विलास पाटील, माजी सरपंच राजाराम मुटल, विकास पाटील, विठ्ठल झोरे, माजी उपसरपंच निवृत्ती खोत, दिपक गावडे, ग्रामपंचायत सदस्य नथूराम खोत, जनार्दन गावडे, तुकाराम झोरे, धनगरवाड्यातील ग्रामस्थ आणि वनसेवक उपस्थित होते.




