तुम्ही गुजरातसाठी लाचारी पत्करलीय… मुख्यमंत्र्यांना विचारले आठ प्रश्न
कोल्हापूर – आज गोकुळ दुध संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठक पार पडत आहे. गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला बहुमत मिळाले आहे त्यामुळे त्यांचाच अध्यक्ष होणे अपेक्षित असताना महायुतीकडून रडीचा डाव खेळत शासन नियुक्त चार तज्ञ संचालकांची नियुक्ती करत त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम पूर्ण करणे गरजेचे असल्याने महायुतीकडून चार तज्ञ संचालकांच्या नियुक्तीचा घाट घातला आहे. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत संताप व्यक्त केला आहे.
राजू शेट्टी यांनी म्हटले आहे कि, गोकुळ दुध संघाच्या चेअरमन निवडीमध्ये महायुती सरकारने रडीचा डाव खेळून आज बेकायदेशीर पद्धतीने चेअरमन निवड करण्याचा घाट घातला आहे. महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत कि संचालक मंडळ सभेचा कोरम पुर्ण करण्यासाठी शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती केले आहे आणि त्यानंतर चेअरमन निवडीचा मार्ग कायदेशीर होणार आहे.
कायद्याचे गाडे अभ्यासक व स्वत:ला विद्वान समजणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नैतिकता असेल तर त्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
- गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीची जाहिरात/ सूचना पहावी व त्यामधील तरतुदी वाचाव्यात.
- त्यात असे लिहिले आहे की ? संचालक मंडळाची निवडणूक सहकारी संस्था अधिनियम, नियम आणि उपविधी ( पोटनियम) चे तरतुदीनुसार घेण्यात येत आहे..
- वरील कार्यपद्धत नमूद असेल तर निवडणूक अधिसूचना निघालेल्या दिवशी जे उपविधी प्रचलित होते त्यानुसारच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली पाहिजे..
- अध्यक्ष निवड सभा आणि संचालक मंडळ कार्यान्वित होण्याची सभा घेणे हे सुद्धा निवडणूक कार्यक्रमात समाविष्ट आहे..
- म्हणजेच प्रचलित कायद्यानुसार व मूळ उपविधीनुसारच पहिल्या सभेसाठी संचालक मंडळ सदस्य संख्या मोजली जाणे आवश्यक आहे…
- त्यामुळे अध्यक्ष निवड प्रक्रिया आणि एकूणच संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्या आधी कायदा किंवा अन्य मार्गाने वाढविलेली संचालक पदे पहिल्या सभेसाठी ग्राह्य धरता येणार नाहीत.
- महायुतीच्या गोकुळ सदस्यांच्या मनात पाप नसेल तर सर्व सदस्यांना आज बैठकीला पाठवावे कोरम पुर्ण झाल्यानंतर बहुमताने जो निर्णय होईल तो स्विकारावा मात्र रडीचा डाव खेळू नये.
- सहकार कायद्यातील तरतुदीनुसार शासन नियुक्त नामनिर्देशीत संचालकांना मतदानाचा अधिकार नाही. देवाभाऊ मला वाटत नाही तुमच्यामध्ये या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिम्मत असेल कारण तुम्ही गुजरातसाठी लाचारी पत्करली आहे, असा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.



