कोल्हापूर – हुपरी-कोल्हापूर हा अत्यंत वर्दळीचा मुख्य मार्ग आहे. उंचगांव, गडमुडशिंगी, कोडोलीसह कर्नाटकाकडे जाणाऱ्या या मार्गावर दररोज अवजड तसेच अन्य वाहनांची मोठी वर्दळ असते. याच मार्गावरील उचगांव – यादववाडी ओढ्यावरील पुलाचे बांधकाम मागील काही दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. पुलाचे काम रखडल्यामुळे वाहतूकीला अडथळा होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाजळवच लहान मुलांची शाळा आहे. या ठिकाणाहून दिवसभरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची वर्दळ असते. पुलाच्या अपुऱ्या कामांमुळे अपघात होऊन जीवीतहानी होऊ नये. यासाठी पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करवीर तालुका पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांना निवेदन सादर केले.
तालुका प्रमुख राजू यादव यांनी, पुलाचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर रास्ता रोको आंदोलन करु, असा इशारा दिला. उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी, पुलाच्या कामाच्या ठिकाणचे वळण अपघातांना निमंत्रण देत असल्याचे सांगितले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता अमोल कोळी यांनी, संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन पुलाचे काम लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, फेरीवाले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.




