गोकुळ निवडणुकीआधी राहुल पाटील गटाला खिंडार; गोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटलांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा

कोल्हापूर : आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. कसबा बीडचे युवा नेते, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक तथा लोकनियुक्त माजी सरपंच सत्यजीत सुरेशराव पाटील यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राहुल पाटील गटाला खिंडार पडले असून, आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सत्यजीत पाटील हे कसबा बीड परिसरातील युवा नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत. गोकुळ दूध संघाचे माजी संचालक तसेच लोकनियुक्त माजी सरपंच म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. स्वर्गीय माजी आमदार पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक असलेले स्वर्गीय सुरेश पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून सत्यजीत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे करवीरच्या पश्चिम भागातील राजकीय समीकरणांमध्ये बदलाची चर्चा सुरू झाली आहे.आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सतेज पाटील यांनी सत्यजीत पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाचे स्वागत केले. स्वर्गीय सुरेश पाटील यांच्यासोबतच्या जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा पाया सत्यजीत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसची विचारधारा पुढे नेण्यासाठी केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हे, तर मजबूत वैचारिक पाया आणि संस्कार आवश्यक असल्याचे सतेज पाटील यांनी नमूद केले. सामान्य नागरिक, शेतकरी, तरुण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका असल्याचे सांगत त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नांवरही भाष्य केले.‘करवीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या विचारांशी जोडलेला असून, या विचारांशी जोडलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संघटना अधिक मजबूत करण्याची गरज आहे,’ असे सतेज पाटील यांनी सांगितले. स्वर्गीय बोंद्रे दादा आणि स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या विचारातील काँग्रेस पुन्हा उभी करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळची निवडणूक’…..

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीवरही सतेज पाटील यांनी भाष्य केले. गोकुळ टिकला पाहिजे आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ही निवडणूक लढविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर सत्यजीत पाटील यांचा काँग्रेस प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.सत्यजीत पाटील यांनीही आपल्या काँग्रेस प्रवेशामागील भूमिका स्पष्ट केली. करवीर तालुक्याच्या राजकारणात आपल्या प्रवेशामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला असल्याचे सांगत, कोणत्याही वैयक्तिक अपेक्षेपेक्षा काँग्रेसची विचारधारा आणि नेतृत्वाला महत्त्व दिल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी एम. आर. पाटील आणि राहुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. काँग्रेसची विचारधारा आणि संघटना मजबूत करण्यासाठी सत्यजीत पाटील यांनी करवीरच्या पश्चिम भागात केलेल्या कामाचा तसेच तरुणांची फळी उभी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला.

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग….

गोकुळ दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध गटांकडून उमेदवार आणि समर्थकांची जुळवाजुळव सुरू असतानाच करवीरमध्ये सत्यजीत पाटील यांचा काँग्रेस प्रवेश झाला आहे. त्यामुळे या प्रवेशाचा आगामी गोकुळ निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

सत्यजीत पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे राहुल पाटील गटाला खिंडार पडल्याचा दावा काँग्रेस समर्थकांकडून केला जात असून, या घडामोडीमुळे करवीरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाकडे केवळ पक्षप्रवेश म्हणून न पाहता स्थानिक राजकारणातील नव्या समीकरणांची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, उदय पाटील सडोलीकर, करवीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, नगरसेवक विनय फाळके, राहुल माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, शशिकांत खोत, एम. आर. पाटील, उदय पाटील, बीडचे सरपंच संतोष मोरे, डॉ. के. एन. पाटील, सुशील देसाई, गुंडू पाटील, शिवाजी गावडे, हिदायत मुल्ला, श्रीनिवास पाटील, भरत रसाळे, रवींद्र पाटील, प्रताप नाईक, सागर पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top