पंचनामे करून तातडीची मदत शेतकऱ्यांना करणार : मुख्यमंत्री

मुंबई – राज्यातील खूप ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट ओढवले आहे. यावर माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पावसाचा खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिके खराब होत आहेत. अनेक ठिकाणी उतारा कमी येईल, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांना यावर चर्चा करून आपापल्या जिल्ह्यांत मूल्यमापन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. साधारणपणे पुढील आठवड्यात आम्ही प्राथमिक आढावा घेऊ. त्यानंतर पंचनामे करू आणि तातडीची मदतही आम्ही करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था असेल, शेतकऱ्यांना जी तातडीची मदत करणे गरजेचे आहे, ती सर्वतोपरी मदत सरकारच्यावतीने केली जाणार आहे. यावेळी अल निनोचे संकट येणार असल्याचे माहिती असल्यामुळे चाऱ्याची लागवड करून ठेवलेली आहे. जिथे चाऱ्याची टंचाई जाणवेल, तिथे पुरवठा केला जाईल. सायंकाळी शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज मिळावी, याचीही तजवीज केलेली आहे. त्यामुळे सगळ्या भागात जास्त वीजही आपण देत आहोत. काही ठिकाणी सिंगल फेज असल्यामुळे वीज दिली जात नव्हती; पण, आता तिथेही वीज देण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Scroll to Top