कोल्हापूर – महानगरपालिकेचा शहर पाणीपुरवठा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्यावतीने शहरातील विविध भागांत पाणीपट्टी थकबाकीदार आणि अनधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत असलेल्या सात थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. तसेच अनधिकृतपणे घेण्यात आलेले नळ कनेक्शनही तोडण्यात आले. या कारवाई सोबतच थकीत पाणीपट्टीची वसुली करण्यात आली असून, आजच्या मोहिमेत तीन लाख ८३ हजार २१ रुपयांची रक्कम वसूल झाली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे पाणीपट्टी थकवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे आणि पाणीपट्टी अधीक्षक बळवंत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वसुली पथक प्रमुख बाबासाहेब पठाण यांच्यासह संजय चौगले, काका बनसोडे, निरंजन चव्हाण, दादा पाटोळे, अरुण प्रभावळे, विजय हेगडे आणि ओंकार मधाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अनधिकृत नळधारकांना दणका : महापालिकेच्या विशेष मोहीमेतून ३ पूर्णाक ८३ लाख वसूल




