मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून मुंबईकडे कूच करण्याचा सकल मराठा समाजाचा इशारा

कोल्हापूर : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची शासनाकडून कोंडी केली जात असल्याचा आरोप सकल मराठा समाज, कोल्हापूरच्या वतीने करण्यात आला आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास वेळ पडल्यास कोल्हापुरातून मराठे मुंबईकडे कूच करतील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा समाजाला न्याय्य हक्क आणि आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे गेल्या १४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, समाजाच्या भावना तीव्र असताना राज्य सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ न पाठवता मराठा समाजाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सकल मराठा समाज, कोल्हापूरने केला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याचा मुद्दाही सकल मराठा समाजाने उपस्थित केला आहे. शांततापूर्ण मार्गाने न्याय मागणाऱ्या आंदोलकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगत या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका भागाचा नसून संपूर्ण मराठा समाजाच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा प्रश्न असल्याचं सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

शासनाने आंदोलकांची मुस्कटदाबी थांबवून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापुरातील समस्त मराठा बांधव योग्य वेळी आणि संघटितपणे मुंबईकडे कूच करतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

यावेळी वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, रुपेश पाटील, ॲड. बाबा इंदुलकर, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, संदीप देसाई, राहुल इंगवले, शाहीर दिलीप सावंत, सुनीता पाटील, शैलजा भोसले, संतोष बर्गे, महेश जाधव, सरदार पाटील आणि योगेश जगदाळे यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top