पोलीस प्रशासन प्रथमच राजारामपुरीतल्या आगमन मिरवणुकीत टायमर चा प्रयोग करणार

कोल्हापूर – शहरातील राजारामपुरीत उद्या सायंकाळी काढण्यात येणाऱ्या गणेश आगमन मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदा लेसर, सिओटू आणि द्रोण वापरावर बंदी घालण्यात आलीय तर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

राजारामपुरीतल्या मिरवणुकीसाठी तीन पोलीस उपाधीक्षक, पाच पोलीस निरीक्षक, २३ पोलीस उपनिरीक्षक, १३० अंमलदार, १०० होमगार्ड आणि जलद कृती दलाच्या दोन तुकड्या असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नऊ नंबर शाळा आणि व्ही.टी.पाटील सांस्कृतिक सभागृहासमोरील पटांगणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. राजारामपुरीतल्या आगमन मिरवणुकीत यावर्षी ५३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होणार आहेत. मिरवणुकीत सर्व मंडळांना सहभाग घेता यावा आणि मिरवणूक रेंगाळत ठेवू नये, यासाठी प्रथमच मिरवणूक मार्गावर सिग्नल द्वारे टायमरचा प्रयोग करण्यात येणार आहे. रेड सिग्नल सुरू झाल्यानंतर एका ठिकाणी एका मंडळाला २० मिनिटे सादरीकरण करता येणार आहे त्यानंतर ग्रीन सिग्नल सुरू होताच मिरवणूक पुढं न्यावी लागणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने मिरवणूक मार्गावर सिग्नल बसवले असून शनिवारी रात्री उशिरा या सिग्नलची चाचणी देखील घेण्यात आली. राजारामपुरीतील नऊ नंबर शाळेपासून मिरवणुकीत प्रवेश करणारी सार्वजनिक मंडळे राजारामपुरी गार्डन मार्गे जनता बाजार चौकातून आग्नेयमुखी मारुती मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.

Scroll to Top