राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या ठेवींमध्ये ४० कोटींची वाढ : अध्यक्षा नवोदिता घाटगे

कोल्हापूर – कागलमधील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. या सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलताना राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी, बँकेच्या गत आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ४० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे सांगितले.

बँकेकडे सातत्याने वाढत असलेल्या ठेवी या सभासद आणि ग्राहकांचा बँकेवरील विश्वासाचे प्रतिक आहे. तसेच राजे बँक लवकरच एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. बाजारातील अस्थिर परिस्थितीतही बँकेला ७ कोटी ४४ लाख रुपयांचा उच्चांकी नफा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्य तरतुदी वजा करून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी, राजे बँकेसमोर कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र विस्तारून शाखा आणि व्यवसाय वाढवण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले. बँकेने यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. सहकार महर्षी दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांचे बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळावा,  हे स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी बँकेने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सन २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लक्ष्मीपुरी कोल्हापूर शाखेला प्रथम, केनवडे शाखेला द्वितीय, तर मुख्य शाखा कागलला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. मुदाळ तिट्टा शाखेला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला तसेच आदर्श कर्मचारी म्हणून संभाजी गाडेकर यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण पाटील, संचालक एम. पी. पाटील, संचालक संजय चौगुले, उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे  यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top