कोल्हापूर – जो जिल्हा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारानं चालतो आणि उठता – बसता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची चर्चा करतो त्या जिल्ह्यात आज गोकुळ मधला निर्णय मुख्यमंत्री घेणार हे मान्य करायचं का..?, असा सवाल आ. सतेज पाटील यांनी उपस्थित केला. ते राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
गोकुळमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सहकार जपला पण महायुती सरकारने फक्त गोकुळसाठी सहकार कायदा बदलला. याला विधानपरिषदेत आ. जयंत पाटील यांनी विरोध करत फक्त गोकुळसाठी सहकार कायदा बदलला असं म्हटलं होतं . यावर मुख्यमंत्र्यांनी, सर्वांसाठी कायदा आणला असल्याचे म्हटले परंतु निवडणूक घेतली असती तर काय झालं असतं ? प्रशासक आणण्यापेक्षा लोकांनी आपलं मत दिलं असतं आणि निर्णय दिला असता, असा घणाघात आ. सतेज पाटील यांनी सभेत केला. स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या मुलाला गोकुळचा अध्यक्ष करताना भाजपवाल्यांनी का विरोध केला ? यासाठी भाजपच्या लोकांनी आडकाठी का घातली, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.




