छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटची मुदत आज संपत असल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, सर्व मराठा समाजाला अंतरवाली सराटीत पोहचण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आंदोलनाच्या मैदानात दिसणार आहे.
सरकारकडून आंदोलन रोखण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी आपल्या प्रमुख मागण्यांवर जरांगे ठाम असल्याने त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने यापूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे पात्र नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासह इतर मागण्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.




