कोल्हापूर – बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सी अॅप वर कायमस्वरूपी बंदी घालावी, ई रिक्षांना परमिट बंधनकारक करावे, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रिक्षा प्रवासी वाहतूक 23 नोव्हेंबरला बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिह्यातील रिक्षा चालक एकत्र येवून 23 नोव्हेंबरला दुपारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रिक्षा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटनांच्या व्यावसायिक अडी-अडचणी संदर्भात राज्यातील सर्व रिक्षा चालकांची बैठक 15 नोव्हेंबरला पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे पार पडली. या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर कायम स्वरूपी बंदी घालण्यात यावी. एटीएस मशिनद्वारे केल्या जाणाऱ्या पासिंगमधून रिक्षाला सुट द्यावी, ई रिक्षांना परमिट बंधनकारक करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्रातील रिक्षा संघटना शासनाच्या धोरणा विरोधात आवाज उठवण्यासाठी टप्प्या टप्प्याने आंदोलन छेडणार आहेत. आंदोलनाचा एक भाग म्हणून 22 नोव्हेंबरला रात्री 12 वाजल्यापासून सोमवारी 23 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रवासी रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटना एकत्र येवून रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी सोमवारी 23 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रिक्षा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.
यावेळी रिक्षा सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव, अविनाश दिंडे, राहुल पोवार, ईश्वर चन्नी,जाफर मुजावर,राजू जाधव,रमेश पोवार,अतुल पोवार,अरुण घोरपडे, राजू जमादार, राजेंद्र थोरावडे यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.




