कागल : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील इच्छुक उमेदवार भैया माने यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सोडल्याचे जाहीर केले आहे. माने यांच्या निर्णयामुळे मुश्रीफ यांना राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक आणि अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करणारे शिलेदार भैया माने यांनी साथ सोडताना भावूक होत आपली भूमिका स्पष्ट केली. “कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
माने यांच्या या भूमिकेमुळे मुश्रीफ यांच्या गटातील एक महत्त्वाचा शिलेदार बाजूला झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक वर्षे मुश्रीफ यांच्या सोबत सावलीसारखे काम केल्यानंतर माने यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने कागलच्या राजकारणातही याची चर्चा रंगली आहे.
भैया माने यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जुन्या संबंधांना उजाळा दिला. “ते आमचे सेनापती होते. त्यांनी अनेक वर्षे सावलीसारखे आमच्याबरोबर काम केले. मात्र, ते आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते निवडणूक लढवतील,” असे मुश्रीफ म्हणाले.
माने यांच्या निर्णयानंतर दोघांमधील राजकीय संबंधांबाबत बोलताना मुश्रीफ यांनी, “माझा आणि त्यांचा संबंध तुटला,” अशी स्पष्ट भूमिका घेतली. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून एकत्रितपणे काम करावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आम्हाला महायुती म्हणून काम करावे लागेल,” असे मुश्रीफ यांनी सांगितले.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर भैया माने यांनी घेतलेली स्वतंत्र भूमिका आणि त्यांची मुश्रीफ यांच्यापासून झालेली फारकत यामुळे कागलसह महायुतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात माने यांच्या भूमिकेचा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.




