कोल्हापूर – कोल्हापूरच्या सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजित विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’च्या प्रतिनिधींनी राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूरच्या विकासाचा व्यापक आराखडा, रेल्वे, पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान ‘कोल्हापूर फर्स्ट’चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी, कोल्हापूर फर्स्ट व्यासपीठाच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची तसेच शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या समन्वयात्मक पाठपुराव्याची माहिती राज्यपालांना दिली. यावेळी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती देणे, कोल्हापूर-सांगली-सातारा-कोकण पर्यटन सर्किट PRASAD योजनेअंतर्गत विकसित करणे, कोल्हापूरला गुंतवणुकीसाठी सक्षम औद्योगिक केंद्र बनविणे, कोल्हापूर-सांगली-सातारा फाउंड्री, इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग हब विकसित करणे, शहरातील वाहतूक व रस्ते सुविधांचे आधुनिकीकरण, तसेच कोल्हापूर-सांगली-इचलकरंजी औद्योगिक व नागरी पट्ट्याचा एकात्मिक विकास आदी प्रमुख गोष्टींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान विकासाविषयक निवेदन राज्यपालांना प्रदान करण्यात आले. यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’च्यावतीने शासन, उद्योगक्षेत्र आणि समाज यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून कोल्हापूरच्या दीर्घकालीन विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव, डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, उद्योजक नीरज झंवर, राजीव पाटील, अजय कोराने आदी उपस्थित होते.




