कोल्हापूर – शिवाजी कोण होता ? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. यामध्ये प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी यांचा सुद्धा उल्लेख करून त्यांबद्दल अश्लील शब्द वापरण्यात आले होते. या घटनेला साडे चार ते पाच महिने उलटले असून, आंबी दाम्पत्य आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांनी एक दोन शब्द आक्षेपार्ह उच्चारल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रातोरात अटक झाली. याच धर्तीवर आरती आंबी आणि काही महिलांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घ्या, या मागणीसाठी कोथरूड पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिवसभर ठाण मांडून होते. त्याच्या सोबत आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित होते. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. दुसरीकडे आज भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल एका महिलेच्या तक्रारीनंतर आयपीसी कलम ७९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. या सगळ्या घटनेवरून आमच्यासोबत असा भेदभाव का केला जातोय ? बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता आहे की भाजप न्याय संहिता आहे, जी फक्त भाजप नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या बाजूंच्या लोकांसाठी आहे. स्त्री मन फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनाच आहे का ? असे अनेक प्रश्न आरती आंबी यांनी उपस्थित केलेत. या सगळ्या प्रश्नांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रशांत आंबी यांनी या सगळ्या घडामोडीनंतर पोलीस हे सरकारचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत, अशी खंत व्यक्त करत निषेध व्यक्त केला. प्रशांत आंबी यांना फोनवरून जी शिवीगाळ केली होती त्यांची ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली होती. नऊ मिनिटाच्या या क्लिपमध्ये आमदार गायकवाड यांनी तब्बल ३८ शिव्या दिल्या होत्या. ज्यात प्रशांत आंबी यांच्या पत्नी यांचा उल्लेख करून त्याबद्दल सुद्धा अश्लील शब्द वापरले होते. इतके होऊन सुद्धा पोलिसांनी आतापर्यंत फक्त बघ्याचीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे जर इतर प्रकरणात गुन्हे दाखल होत असतील आणि कार्यतत्परात दाखवली जात असेल तर आमच्याच बाबतीत दुजाभाव का ? हा प्रशांत आणि आरती आंबी यांनी उपस्थित केलेला प्रश्न रास्त आहे. आता या सगळ्या घडामोडीनंतर पुन्हा एकदा जनतेतून याबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. या सगळ्यावर पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरती आंबी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार का, आंबी दाम्पत्याला न्याय मिळणार का, त्यांची तक्रार दाखल करून घेतली जाणार का, हे पहावे लागणार आहे.




