पर्यटकांना बंदी पण मोकाट जनावरांचा मुक्त संचार
कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरण परिसरातील दूधगंगानगरमध्ये कर्नाटकातील म्हैसूरच्या प्रसिद्ध वृंदावन गार्डनच्या धर्तीवर मिनी वृंदावन उद्यान साकारण्यात आले होते. साधारण २००६ पर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले होते. आकर्षक रचना, हिरवाई आणि धरण परिसराचे निसर्गसौंदर्य यामुळे येथे दरमहा हजारो पर्यटक येत होते. यातून शासनाच्या तिजोरीत चांगला महसूल सुध्दा जमा होत होता. मात्र, कालांतराने देखभाल दुरुस्तीचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या देखण्या पर्यटनस्थळाची अवस्था दयनीय झाली आहे. उद्यानाची देखभाल करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही उपलब्ध नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी विकसित करण्यात आलेले हे ठिकाण आज ओसाड पडले आहे. आता या उद्यानात पर्यटकांना बंदी असली तरी येथे आता मोकाट जनावरांचा मुक्त वावर असतो.
विशेष म्हणजे, काळम्मावाडी धरणात अतिसंवेदनशील जलसाठा असताना धरण परिसरातील अशा ठिकाणी अनियंत्रित जनावरांचा वावर असणे सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरतो आहे. एकीकडे जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा होत असताना दुसरीकडे पर्यटनाचे वैभव असलेले ‘मिनी वृंदावन’ मात्र अखेरची घटका मोजू लागला आहे. कधीकाळी पर्यटकांनी गजबजून जाणारे हे उद्यान पुन्हा एकदा फुलावे आणि काळम्मावाडीला पर्यटनाच्या नकाशावर पुन्हा मानाचे स्थान मिळावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि पर्यटक व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाने केवळ आश्वासने देऊन न थांबता या उद्यानाच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.




