मुंबई – एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये आयोगाबाबत अविश्वास वाढत चालला आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास वाढण्यास मदत होईल, असं मत व्यक्त केले आहे.
वाढत्या पेपर फुटीच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे एमपीएससीच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अध्यक्षपदी नियुक्त करावा, अशी मागणीही आ. रोहित पवार यांनी मांडली आहे. गट-ब, पीएसआय आणि कृषी विभागाच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे सरकारने गांभीर्याने पहावे. पुढील तीन दिवसांत या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.




