कोल्हापूर – रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी १२ कोटी रुपयांचा खर्च करण्याच्या प्रस्तावावरून कोल्हापुरात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काऊनॉमिक्स टेक्नॉलॉजी या कंपनीकडून रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी १२ कोटींचे आयुर्वेदीक औषध घेण्याचे टेंडर भरण्यात आले आहे. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार बैठकीत प्रश्न उपस्थित करत आमदार राजेश क्षीरसागर आणि महापालिका प्रशासनावर निशाणा साधला.
रंकाळा तलावात आयुर्वेदिक औषधांची फवारणी करून प्रदूषणमुक्ती केली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, रंकाळ्यात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी येत असताना, त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून एसटीपी अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची गरज असल्याचे इंगवले यांनी म्हटले आहे. फक्त औषधांची फवारणी करून प्रदूषणाचा प्रश्न सुटणार असेल, तर त्याचा शास्त्रीय आधार काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. १२ कोटींच्या या प्रकल्पाचे पेटंट शनिवार पेठेतून आलंय, असा आरोपही इंगवले यांनी केला आहे.
शिवाजी विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक, रंकाळा बचाव समिती आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांसमोर या प्रकल्पाचा डेमो देण्यात यावा, अशी मागणी करत इंगवलेंनी आयुक्तांवर सुध्दा निशाणा साधला. आधी डेमो दाखवा, तज्ज्ञांकडून शहानिशा करा आणि मगच १२ कोटींचा प्रकल्प राबवा, असा थेट इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला आहे.
दरम्यान, रंकाळा परिसरातील सुशोभीकरणाच्या कामांवरही इंगवले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रंकाळ्यातील कारंजे दिवसातून केवळ काही मिनिटांसाठी सुरू राहणार असतील, तर त्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचे प्रयोजन काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राजाराम तलाव परिसरात होणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरचे भविष्यात हॉटेलमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुशोभीकरण आणि प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटायला आमचा विरोध असेल अशी भूमिका इंगवले यांनी पत्रकार बैठकीत मांडली.




