कोल्हापूर – राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून गोकुळ दूध संघ टिकवणे आणि उत्पादकांना न्याय मिळवून देणे हाच मुख्य हेतू असल्याचे, प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. ते आजरा तालुक्यातील ठराव धारकांच्या गाठीभेटीवेळी बोलत होते.
गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्यावतीने आमदार सतेज पाटील यांनी आजरा तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बहिरेवाडी, मुम्मेवाडी, उत्तूर, मडीलगे, आजरा शहर, किणे, कोळिंद्रे, पेद्रेवाडी, पेरणोली, देव कांडगाव आणि अर्धाळ येथील ठरावधारकांशी थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, उदय देसाई, रणजीत देसाई, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी पाटील, युवराज पाटील आणि अनिकेत चराटी आदी प्रमुख नेत्यांची भेट घेतली.
यावेळी ठरावधारकांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार केला आहे. हे पॅनल थेट शेतकऱ्यांचे आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे हाच माझा मुख्य हेतू आहे. याचबरोबर येत्या काळात पशुखाद्याचे दर कमी केले जातील. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाचे दर वाढवले जातील. म्हैस खरेदीसाठी विशेष अनुदान दिले जाईल आणि म्हैस-गाय दूध उत्पादन वाढीसाठी ठोस प्रयत्न केले जातील. तसेच गेल्या पाच वर्षांत गोकुळचा वापर राजकारणासाठी कधीही केला नाही. सध्याच्या परिस्थितीत सुनावणी आणि हरकतींच्या नावाने त्रास दिला जात असून, गावातील दूध संस्था बदनाम का केल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. गोकुळच्या अधिक प्रगतीसाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पॅनलला पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आजरा जनता बँकेचे मुकुंद देसाई म्हणाले की, जिल्ह्यात सहकार टिकवण्याचे काम अनेकांनी केले आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गोकुळचा कारभार उत्तमरित्या चालला आहे. त्यामुळे आजरेकर पुन्हा एकदा ही सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी, गेल्या पाच वर्षांत नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून पाच लाख दूध उत्पादकांच्या हिताची कामे केल्याचे सांगत, पुढील काळातही चांगलं काम करण्याची संधी आम्हाला ठराव धारकांनी द्यावी, असे प्रतिपादन केले.




