सुरक्षा अन् नोकरीची हमी दिल्यानंतर महिला हेड कॉन्स्टेबलने दिली साक्ष...त्यानंतर ''या'' न्यायालयाने नऊ पोलिसांना सुनावली फाशीची शिक्षा
चेन्नई – २०२० मध्ये तामिळनाडूतील सांथनकुलम येथे वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी मोठी खळबळ उडाली होती. या मृत्यूचा खुलासा चक्क पोलिस स्टेशनमधील महिला हेड कॉन्स्टेबलने सुरक्षा आणि नोकरीची हमी दिल्यानंतर न्यायालयासमोर दिली आहे. त्यामुळे तब्बल सहा वर्षानंतर कोठडीतील मृत्यूची सत्यता समोर येवून मदुराई न्यायालयाने नऊ पोलिसांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
दोन मुलींची आई असणारी हेड कॉन्स्टेबल रेवती (43) यांनी न्यायालयात प्रत्येक क्षणाची घटना कथन करून पोलीस ठाण्यात काय घडले आणि त्यासाठी कोण जबाबदार होते हे सिद्ध केले आहे.
ही घटना जून 2020 मध्ये घडली, तामिळनाडू राज्यातील तुतीकुडी जिल्ह्यातील सांथंकुलम पोलिसांनी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा, जे. बेनिक्स, यांना त्यांचे मोबाईल दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्यामुळे ताब्यात घेतले होते. कॉन्स्टेबल रेवती यांनी न्यायालयाला सांगितले की, "मी रात्री 8:50 च्या सुमारास पोलिस स्टेशनला पोहोचलो. त्याच क्षणी, मला आतून किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू आले, कोणीतरी ओरडत होते, 'आई, दुखतंय! मला सोडा! कृपया मला सोडा! मी काही चुकीचं केलेलं नाही"
कधीकधी सब-इन्स्पेक्टर बालकृष्णन यांचा आवाज ऐकू येत होता, ते म्हणत होते, "स्टेशनमध्ये गोंधळ घालण्याची तुमची हिम्मत कशी झाली? तुम्ही काही मोठे मर्द आहात का?" पोलिसांनी जयराज आणि बेनिक्स यांना रक्त येईपर्यंत मारहाण केली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांनी मुलगा बेनिक्स मरण पावला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वडील जयराज मरण पावले.त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली, पण पोलीस खात्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. नऊ पोलिसांवर आरोप ठेवण्यात आले.
सहकारी अधिकाऱ्यांनी इशारा देऊनही, रेवती यांनी बोलण्याचा निर्णय घेतला. जबाब नोंदवताना, बाहेर जमलेले पोलीस अधिकारी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना धमक्या देत होते आणि रेवती यांचा अपमान करत होते. तणाव इतका तीव्र होता की दंडाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षक तैनात करावे लागले. सुरक्षेचे आश्वासन मिळाल्यानंतरच रेवती यांनी सही करण्यास संमती दिली. सीसीटीव्ही फुटेजमधील प्रत्येक आरोपीला ओळखले. तिच्या क्षणोक्षणीच्या साक्षीने हे सिद्ध झाले की त्या रात्री पोलीस ठाण्यात कोण उपस्थित होते आणि त्या दोघांच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार होते. हे सर्व रेवती यांनी धैर्याने सांगितले. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.