बुलेट स्वारांच्या मोटोव्हर्स स्पर्धेत कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स रेसिंग टीमची चमकदार कामगिरी

<p>बुलेट स्वारांच्या मोटोव्हर्स स्पर्धेत कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स रेसिंग टीमची चमकदार कामगिरी</p>

कोल्हापूर – बुलेट स्वारांच्या मोटोव्हर्स स्पर्धेत कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स रेसिंग टीमने चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धकांनी विविध प्रकारच्या १३ स्पर्धांमध्ये २१ पारितोषिके आणि होल शॉट मध्ये ५ पदके पटकावली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स क्लबची निवड करण्यात आली आहे.

दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बुलेट स्वारांचा क्लब म्हणून कोल्हापुरातील रॉयल रायडर्स क्लब सर्वपरिचित आहे. या क्लब मध्ये कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, हुपरी निपाणी, रत्नागिरी परिसरातील तीनशेहून अधिक रायडर्स आहेत. या क्लबच्या माध्यमातून दर महिन्यात एक बुलेट राईडचे आयोजन केले जाते. रॉयल एनफिल्ड कंपनीतर्फे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बुलेट स्वारांसाठी गोवा येथे मोटोव्हर्स ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचा एक भाग म्हणून डर्ट ट्रॅक शर्यतीचे देखील आयोजन केले जाते. यावर्षीच्या स्पर्धेत रॉयल रायडर्स क्लबच्या तब्बल ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

 या स्पर्धेत भूषण भोसले, ओंकार बुधले, पिंकेश ठक्कर, महेश चौगले, पुष्कर घोरपडे, अतिका सूर्या, सुहानी पाटील, व्हॅनेसा जोसेफ यांनी विविध स्पर्धांमध्ये तब्बल २१ पारितोषिक मिळवल्याचे क्लबचे अध्यक्ष संतोष शर्मा यांनी सांगितले. विजेत्या स्पर्धकांचा आयशर मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावर्षी रॉयल रायडर्स क्लबने द्वितीय स्थानावर आलेल्या क्लबच्या गुण संख्येमध्ये तब्बल ४६० गुणांचा फरक ठेवून यश मिळवले आहे.

या संपूर्ण टीमचे व्यवस्थापक म्हणून जयदीप पवार, सचिन घोरपडे, ओंकार बुधले श्रीनिकेतन कुलकर्णी, अभिजीत काशीद यांनी जबाबदारी पार पडली. यावर्षीच्या स्पर्धेत क्लबचे सदस्य श्रीनिकेतन कुलकर्णी, समीर मिस्त्री, श्रीजय अथणे, प्रमोद चौगले, हर्ष तेजम, प्रतीक सूर्यवंशी, किरण प्रसाद, सोहम माळी यांनीही सहभाग नोंदवला होता. रॉयल रायडर्स क्लबच्या रेसिंग टीमला मोहिते रेसिंग अकॅडमीचे संचालक अभिषेक मोहिते, ध्रुव मोहिते आणि मोटर इंडिया बुलेट शोरूमचे मालक रत्नाकर बांदिवडेकर यांनी सहकार्य केले आहे.