‘या’ दोघी ठरल्या विजयाच्या शिल्पकार...भारतीय महिला संघाने २०२५ च्या वर्ल्डकपमध्ये रचला इतिहास...
मुंबई - वूमन्स वर्ल्डकप २०२५ फायनलमध्ये भारताच्या महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या सामन्यात शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या विजयाच्या शिल्पकार ठरल्या आहेत.
फायनलमध्ये दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हरमनप्रीत कौरने अफलातून झेल टिपला आणि हरमनप्रीत कौरच्या फौजेने विजयाची मोहर उमटवली. अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचं आव्हान परतावून लावत भारतीय महिला संघाने पहिल्यावहिल्या ऐतिहासिक जेतेपदाची कमाई केली आहे. यामुळे कपिल देव (१९८३), महेंद्रसिंग धोनी (२००७, २०११), रोहित शर्मा (२०२४) या मांदियाळीत आता हरमनप्रीत कौरच्या नावाचा समावेश झाला आहे.
२०१७ मध्ये भारतीय संघाला वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या पराभवाची सल या खेळाडूंनी भरून काढली आहे.
या विजयानंतर विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला आयसीसीने ४.४८ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास ३९.५५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोख ५१ कोटी रुपये जाहीर केले आहेत.