कोल्हापुरातील क्रीडा संकुलमधील लॉन टेनिस कोर्टाची दुरावस्था
कोल्हापुरातील संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातल्या लॉन टेनिस कोर्टाची दुरावस्था झालीय. लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्यानंतरही कोर्टाची अवस्था बिकट असून, अधिकारी मात्र याकडं कानाडोळा करतायेत . या निष्काळजीपणाबद्दल खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जातोय.
शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या संभाजीनगरमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी स्वतंत्र मैदानं आणि कोर्ट आहेत. त्यात लॉन टेनिससाठी विशेष कोर्ट तयार करण्यात आलंय. मात्र, या कोर्टाची स्थिती अतिशय दयनीय झालीय. कोर्टवर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत, लाईन्स पुसल्या गेल्यात, जाळी फाटली असून आजूबाजूला रान उगवलंय. अशा परिस्थितीत खेळाडूंना सराव करणंही कठीण झालंय. दरवर्षी या संकुलाच्या देखभालीसाठी लाखोंचा निधी खर्च केला जातोय, मात्र कोर्टाच्या स्थितीकडे कुणी लक्ष देत नाही, असा आरोप करत "लाखो रुपयांचा निधी जातोय कुठं? अधिकारी नेमकं काय करतात?" असा सवाल विचारला जातोय.अधिकारी फक्त उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिसतात, बाकी लक्ष कुणाचंच नसतं. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खेळाडूंनी कोर्टाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केलीय.