डी. वाय. पाटील जूनिअर कॉलेजचा मानस महाडेश्वर व प्रणाली गोरे शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट झेवियर्स हायस्कूल येथे आयोजित शासकीय शालेय 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या.
स्विस लीग व राऊंड रॉबिन पद्धतीने, जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मानस महाडेश्वर (डी. वाय. पाटील जूनिअर कॉलेज) याने सर्व सहा सामने जिंकून अजिंक्यपद पटकावले. शंतनु पाटील (कोल्हापूर हायस्कूल) याने पाच गुणांसह उपविजेतेपद, तर श्रेयस बावधनकर (गोखले ज्युनिअर कॉलेज) याने साडेचार गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. अन्य उल्लेखनीय खेळाडूंमध्ये यश भागवत (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) व अक्षत निल्ले (शांतिनिकेतन) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर राहिले.
मुलींच्या गटात, सात फेऱ्यांनंतर प्रणाली गोरे (विवेकानंद जूनिअर कॉलेज) हिने साडेसहा गुणांसह अजिंक्यपद मिळवले. सिद्धी वरपे (पद्माराजे गर्ल्स हायस्कूल) साडेपाच गुणांसह उपविजेती, तर वैष्णवी काळे (देशभक्त रत्नाप्पा कुंभार जूनिअर कॉलेज) पाच गुणांसह तृतीय क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरली. स्वरूपा हजारे (विवेकानंद जूनिअर कॉलेज) व आरोही जाधव (पद्माराजे गर्ल्स हायस्कूल) यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळवले. दोन्ही गटांतील पहिल्या पाच खेळाडूंची निवड विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर मनपाच्या संघात करण्यात आली.
या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर मनपाचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, FIDE प्रशिक्षक मनिष मारुलकर यांच्यासह आरती मोदी, किरण खटावकर, राहुल माने, सचिन भाट, प्रशांत पिसे, उत्कर्ष लोमटे, पल्लवी दिवाण, अल्ताफ कुरेशी व अनीश गांधी यांनी मोलाचे योगदान दिले.