सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग तात्काळ थांबवावे – प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था
कोल्हापूर : खानविलकर पेट्रोल पंपालगत असणाऱ्या सार्वजनिक रस्त्याचा पार्किंगसाठी बेकायदेशीर वापर होत असल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने केली असून, हा प्रकार त्वरित बंद करावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केली आहे. याबाबतची तक्रार ई-मेलद्वारे कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक तसेच पोलीस प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल पंपाशेजारील शंभर फुटी रस्त्यावर लक्झरी बस आणि इतर मोठ्या वाहनांचे पार्किंग करण्याचे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडूनच करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावर नियमितपणे मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असून, परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि वाहतुकीचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्वामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
याच ठिकाणी राजकीय सभा घेण्याचे प्रकारही बेकायदेशीर असून, त्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप संस्थेने केला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ नुसार सार्वजनिक रस्त्याचा मूळ उद्देश बदलणे हा गुन्हा ठरतो, तरीही या भागात बेकायदेशीर जमिनीच्या वापरात बदल करण्यात येत असल्याचा दावा देसाई यांनी केला.
रस्त्याचा मूळ उद्देश सारेपार बदलणाऱ्या या प्रकाराला प्रशासनाने तातडीने आळा घालावा, तसेच खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील बेकायदेशीर पार्किंग आणि राजकीय सभा तात्काळ बंद कराव्यात, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने केली आहे.