आरोग्य स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा
कामात सुधारणा करण्याचा प्रशासकांचा सर्व आरोग्य निरिक्षकांना इशारा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागाचा आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. बैठकीत स्वच्छता व्यवस्थेबाबत महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीच्या प्रारंभी प्रशासकांनी सर्व निरीक्षकांकडून त्यांच्या प्रभागातील स्वच्छतेची माहिती घेतली. पुईखडी येथील पाच टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेताना, प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त जागा व उपकरणे उपलब्ध करण्याचे नियोजन तातडीने करावे, असे निर्देश दिले.स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने सर्व निरीक्षकांनी तत्काळ कामात सुधारणा करावी, असे प्रशासकांनी स्पष्ट केले. “चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान होईल; मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. आरोग्य विभागात सक्षम कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षक पदासाठी संधी देण्यात येणार असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
➡️हॉटेल वेस्ट, मार्केट स्वच्छता स्वतंत्र यंत्रणा..
शहरातील हॉटेल वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र विभागीय आरोग्य निरिक्षक नियुक्तीचे आदेश दिले. संबंधीत सर्व आरोग्य निरिक्षकांनी व विभागीय आरोग्य निरिक्षकांनी विभागीय कार्यालयातील सहा.आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करावे. मार्केटमधील कचरा संकलनासाठी ज्या त्या मार्केटच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य निरिक्षकांवर जबाबदार निश्चित करण्यात आली. जुन्या वॉर्डनिहाय नियोजनाऐवजी सर्व निरीक्षकांना स्वतंत्रपणे जबाबदाऱ्या देऊन त्याचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी दिले.
➡️भटके कुत्रे, दंडात्मक कारवाई, जनजागृती यावर भर...
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या तक्रारी वाढत असल्याने डॉग स्क्वॉडच्या शस्त्रक्रियेचे अहवाल तातडीने सादर करावेत, अशी सूचना सहायक आयुक्तांना देण्यात आली. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, संबंधित ठिकाणी त्यांचे फोटो प्रदर्शित करावेत तसेच वाहनातून कचरा टाकणाऱ्यांची छायाचित्रे आरटीओकडे पाठवून त्यांच्या परवान्याबाबत कारवाई करावी, असे निर्देश दिले.
➡️नवीन वाहने – कचरा उठावाचे काटेकोर नियोजन...
आरोग्य विभागाला नवीन अतिरिक्त वाहने मिळणार आहेत. त्यामुळे कचरा उठाव अधिक प्रभावीपणे करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असून आज सायंकाळपर्यंत इस्टीमेट सादर करण्याचे निर्देश शहर अभियंता यांना दिले.
➡️उद्यान, रंकाळा परिसर, स्मशानभूमी सुधारणा...
शहरातील उद्यानांसाठी स्वतंत्र माळी नियुक्त केला जाणार असून रंकाळ्यावर वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर अधिक स्वच्छता कर्मचारी देण्यात येतील. यासाठी स्वतंत्र आरोग्य निरिक्षक नियुक्तीचे निर्देश दिले. गवत कापणीसाठी गवत कटींग मशीन खदेची करण्याचे आदेश व ड्रेनेज विभागासाठी रॉडींग खदेरी करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्मशानभूमीसाठी आवश्यक साहित्याची तात्काळ खरेदी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर स्मशानभूमीतील स्टोरेज व इतर सुविधेबाबत आजच कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर तसेच सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.