महामार्गाची कामे वेगाने पूर्ण करा; अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

<p>महामार्गाची कामे वेगाने पूर्ण करा; अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश</p>

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 (रत्नागिरी–कोल्हापूर) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (कागल–सातारा) या प्रकल्पांची कामे अधिक वेगाने पार पडावीत यासाठी आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून कामे गतीमान करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत प्रकल्प संचालक एस. एस. कदम, प्रबंधक गोविंद बैरवा, उपजिल्हाधिकारी (समन्वय) अर्चना नष्टे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार व कंत्राटदार संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी , “महामार्ग प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे.” असे सांगितले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (कागल–सातारा) वरील कामे संथ गतीने सुरू असल्याने यासाठी जबाबदार संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या मार्गासंबंधित ठेकेदारांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आदेशही दिले.

महामार्ग क्र. 166 (रत्नागिरी–कोल्हापूर) मार्गावरील भूसंपादनातील अडचणी, महामार्गावरील खड्डे व वाढलेला प्रवासकाल याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. प्रलंबित कामे पूर्ण होण्याच्या कालावधीबाबत विचारणा केली असता एप्रिल 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदारांनी दिले.