"एसन्यूज" बातमीचा इम्पॅक्ट — पंचगंगा स्मशानभूमीत प्रशासनाची धडक पाहणी

<p>"एसन्यूज" बातमीचा इम्पॅक्ट — पंचगंगा स्मशानभूमीत प्रशासनाची धडक पाहणी</p>

कोल्हापूर : 'काही' दिवसांपूर्वी पंचगंगा स्मशानभूमीतील शेणीचा तुटवडा, पडक्या भिंती आणि बिघडलेल्या स्वच्छतागृहांबाबत प्रसारीत केलेल्या बातमीची प्रशासनाने त्वरित दखल घेतली आहे. आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी स्वतः स्मशानभूमीला भेट देत सुरू असलेल्या कामांची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान दान स्वरूपात येणाऱ्या शेणी, ठेकेदारामार्फत महापालिकेकडे जमा होणाऱ्या शेणी आणि उद्यान विभागाकडून मिळणाऱ्या लाकडाच्या साठ्याच्या नोंदी त्यांनी तपासून पाहिल्या. तसेच मागील सहा महिन्यांचे रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना दिले. स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. लाकूड व शेणी ठेवण्यासाठीचे शेड कमकुवत झाल्याची नोंद घेत तातडीने दुरुस्तीसाठी शहर अभियंत्यांना आदेश देण्यात आले. परिसरातील स्वच्छतागृहांबाबतही नवीन एस्टीमेट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यानंतर प्रशासकांनी पंचगंगा घाटावर बांधल्या जात असलेल्या ‘आकांक्षी शौचालय’ (अॅस्पिरेशन टॉयलेट) प्रकल्पाची पाहणी केली. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश कनिष्ठ अभियंत्यास देण्यात आले. घाट परिसरातील बॉटनिकल गार्डनमधील अपूर्ण कामेही तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.

पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आणि आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.