खड्डेमय रस्त्यांमुळे इचलकरंजीकरांना होतोय धुळीचा त्रास...
कोल्हापूर – इचलकरंजी शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध विकास कामांना वेग आला आहे. मात्र त्या कामांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे.
शहरात धुळीचं प्रमाण अचानक वाढल्याने श्वसनाचे आजार, धुळीची अंचलर्जी, डोळ्यांचे संसर्ग, दमा, खोकला, सर्दी अशा तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. स्थानिक डॉक्टरांच्या मते, सतत धुळीच्या संपर्कात राहिल्याने विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा, अॅथलर्जीचे रुग्ण यांच्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
अनेक नागरिकांनी मास्कचा वापर अनिवार्य केला असला तरी सतत उडणारी दाट धूळ आरोग्याला धोका निर्माण करत आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज पाइपलाइन, पाणीपुरवठा आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र या कामांसाठी ठेकेदारांकडून ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्याने नागरिकांचा त्रास अधिकच वाढलाय. काही ठिकाणी खोदकाम करून ते तसेच सोडून दिले आहे, तर काही ठिकाणी डांबरीकरण न केल्याने रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि व्यावसायिकांना दिवसभर त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असल्या तरी अद्याप प्रभावी उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी, रस्त्यांवर नियमित पाणी फवारणी करावी आणि धुळीवर नियंत्रणासाठी तातडीचे उपाय करावेत, अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत. शहर विकासाची कामे महत्त्वाची असली तरी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करता येणार नाही, असा सूर नागरिकांतून उमटत आहे.