पंचगंगा स्मशानभूमीत शेणीचा तुटवडा- अंत्यसंस्कारास विलंब,महापालिकेविरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना

<p>पंचगंगा स्मशानभूमीत शेणीचा तुटवडा- अंत्यसंस्कारास विलंब,महापालिकेविरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना</p>

कोल्हापूर – पंचगंगा स्मशानभूमीसह शहरातील इतर स्मशानभूमींमध्ये शेणीचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय. स्मशानभूमीतील शेणीचे गोडावून पूर्णतः रिकामे झाल्याने शुक्रवारी एका मृतदेहाचे अंत्यसंस्कार तब्बल दोन तासांनी करण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळं नगरिकांमध्ये संतापाची भावना चांगलीच उसळली.

शहरातील पंचगंगा, कदमवाडी, कसबा बावडा आणि बापट कॅम्प येथील स्मशानभूमींमध्ये नियमितपणे अंत्यसंस्कार होतात. त्यापैकी पंचगंगा स्मशानभूमी सर्वांत जुनी असून शहरासह उपनगरातील मृतदेहांवर इथे मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या काही दिवसांपासून येथे शेणीचा तुटवडा असून संपूर्ण गोडावून रिकामं पडलंय. उपलब्ध शेणी फक्त काही दिवसपुरत्याचं पुरतील इतक्याच असल्यानं कदमवाडी आणि कसबा बावडा स्मशानभूमीतून शेणी मागवावी लागत आहे. मात्र, तिथंही शेणींची कमतरता असल्यानं परिस्थिती गंभीर झालीय.

✅दररोज सुमारे ७ हजार शेणींची गरज -
पंचगंगा स्मशानभूमीत दररोज 10 ते 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. एका मृतदेहास सरासरी 500 ते 600 शेणी लागतात. त्यामुळे दररोज 5 ते 7 हजार शेणींची मागणी असते. शुक्रवारी शेणी नसल्यानं एका मृतदेहाच्या नातेवाईकांना दोन तास प्रतीक्षा करावी लागली. शेवटी कसबा बावड्यातून शेणी आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे नातेवाईकांकडून महापालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळं अशी वेळ यायला नको होती, अशा प्रतिक्रिया अनेकांकडून देण्यात आल्या.

✅गॅस दाहिनी असूनही वापर कमी - महापालिकेने कोट्यवधी खर्च करून पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविलीय. मात्र, नागरिकांची मानसिकता बदलत नसल्यानं तिचा वापर अत्यल्प आहे. दुसरीकडे, यंदा पावसाचा कालावधी वाढल्याने शेणीचे उत्पादन कमी झालंय. ग्रामीण भागातही शेणीची उपलब्धता घटत असल्यानं भविष्यात तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. लाकूडही महाग आणि दुर्मिळ होत असल्यानं गॅस दाहिनीचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

✅महापालिकेची उशिरा जाग; आता टेंडर प्रक्रिया -
शेणी तुटवड्याची स्थिती निर्माण झाल्यानंतरच महापालिकेनं खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आलीय. “तहान लागल्यावर विहीर खोदायची” ही महापालिकेची सवय पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, शहरातील दानशूर संस्था, मंडळं आणि नागरिकांनी शेणीदान मोहिम राबवण्याची गरज असून पुरेशा शेणी उपलब्ध न झाल्यास अंत्यसंस्कार प्रक्रिया गंभीर अडचणीत येऊ शकते.

✅गोडावूनची भिंत धोकादायक -
शेणी तुटवड्याबरोबरच गोडावूनच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर आहे. इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केलीय. शेणी साठवण्यासाठी त्वरित नव्या सुरक्षित गोडावूनची आवश्यकता असल्याची मागणीही होत आहे.

✅महिलांची वाढती उपस्थिती; स्वच्छतागृहाची वाईट अवस्था -
अंत्यसंस्कारासाठी आता महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, स्मशानभूमीत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्थाही उघड झाली असून तिथे स्वच्छता, पाणी आणि दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय. त्यामुळे नवीन महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.