परिख पूल परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपूरी कार्यक्षेत्रातील परीख पुल परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटर करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाची मंगळवारी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह फिरती करुन वाहतूक वळविण्याच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी संबंधीत ठेकेदाराला हे काम जलद गतीने व दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या. याठिकाणी आर.एल.ज्वेलर्स ते जेम्स स्टोन कडून परिख पुलाकडे येणारी वाहूतक व रेल्वे फाटकाकडून जेम्सस्टोनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून दुसऱ्या बाजूची मध्यवर्ती बसस्थानकाच्या कंपाऊंडला लगतचा रस्ता एकेरी वाहतूकीस सुरू ठेवण्यात येणार आहे. सदरच्या रस्त्याचे काम पुर्ण झालेनंतर तो रस्ता खुला करुन त्यानंतर दुसऱ्या बाजुचा एकेरी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या रस्त्यास पर्यायी असलेल्या रस्त्याचा वापर करुन वाहतूकीस अडथळा होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता अरुण गुजर, शाखा अभियंता मीरा नागीमे, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाचे सहाय्यक अभियंता युनूस भेटेकर, मिलिंद जाधव, प्रिया पाटील, ठेकेदार अनिल पाटील उपस्थित होते.