कोल्हापुरात प्लास्टिक कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम — प्लास्टिक द्या आणि साखर घ्या...!

<p>कोल्हापुरात प्लास्टिक कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम — प्लास्टिक द्या आणि साखर घ्या...!</p>

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील वाढत्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’ तर्फे एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या घरातील वापरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जमा केल्यास, त्यांच्या बदल्यात साखर दिली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश शहरातील प्लास्टिक कचरा इतरत्र विखुरणे थांबवणे, लोकांना प्लास्टिक पिशव्या जपून ठेवण्यास प्रोत्साहित करणे आणि त्या योग्य मार्गाने रिसायकलिंगसाठी पाठवणे हा आहे.

➡️गांधी जयंतीनिमित्त उपक्रमाची घोषणा, 26 ऑक्टोबरला सुरुवात...
हा उपक्रम २ ऑक्टोबर – महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने जाहीर करण्यात आला होता. याचा शुभारंभ रविवार, २६ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. उद्घाटन सुनीता देसुरकर आणि अतुल शहा यांच्या हस्ते झाले. पहिल्याच दिवशी सहा कुटुंबांकडून ६ किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला आणि त्यांना साखर देऊन सन्मानित करण्यात आले.

➡️‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’ची टीम पुढाकारात आघाडीवर...
या अभियानाला यशस्वी करण्यासाठी सुहास बट्टेवार, परितोष उरकुडे, राहुल चौधरी, नितीन कुलकर्णी, विलास पंदारे, नारायण लळीत, आशिष कोंगळेकर, तृप्ती देशपांडे, विशाल शिराळकर, अभिजीत कुलकर्णी आणि अन्य सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “अर्थ वॉरियर्सचा हा प्रयत्न कोल्हापूरमधील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यात नक्कीच मोलाची भूमिका बजावेल,” असा विश्वास व्यक्त केला.

➡️प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी उपक्रम राबवला जाणार...
हा उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी, रंकाळा टॉवर समोरील करवीर तीर्थ अपार्टमेंटमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’च्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.