“चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया” — राज युथ फाउंडेशनकडून २०वे रक्तदान शिबिर
कोल्हापूर : स्वर्गीय राजू टोपकर यांच्या स्मरणार्थ राज युथ फाउंडेशनच्या वतीने सलग २०व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया” या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिबिराची सुरुवात राजू टोपकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कळंबा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात हे शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ११६ रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजातील माणुसकीचा संदेश दिला.
राज युथ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यात सातत्य ठेवत फाउंडेशनने यंदाही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळवला. या रक्तदान शिबिराचे आयोजन राज युथ फाउंडेशन, जायंट्स ग्रुप ऑफ कळंबा आणि राजे शिवाजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण टोपकर, राजाराम कोंडेकर, शैलेश टोपकर, भिकाजी गुरव, युवराज पाटील, महेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.