कोल्हापूर महापालिकेला आरोग्य विषयक सेवेत राज्यात प्रथम क्रमांकाचा मान 

<p>कोल्हापूर महापालिकेला आरोग्य विषयक सेवेत राज्यात प्रथम क्रमांकाचा मान </p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेने आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती अंतर्गत कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमात राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दलचे प्रशंसापत्र अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन व शालेय आरोग्य), पुणे यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण धनवाडे व मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या नियोजनानुसार शहरातील महापालिकेची हॉस्पिटल्स, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व नागरी आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्रे यांच्या माध्यमातून माता-बाल संगोपन व लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.

राज्य शासनाने सप्टेंबर अखेर कार्यक्रमांचे सविस्तर मूल्यांकन केले असता, कोल्हापूर महानगरपालिकेला एकूण ८९ गुण मिळाले असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याची नोंद झाली आहे.

या मूल्यांकनात गरोदर माता नोंदणी, बारा आठवड्यांपूर्वी नोंदणी, गरोदर माता लसीकरण, लोहयुक्त गोळ्यांचे वितरण, प्रसूतीपूर्व चार तपासण्या, अति जोखमीच्या मातांचा पाठपुरावा, जिवंत जन्म नोंदणी तसेच ० ते १६ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण या निर्देशकांचा समावेश होता. त्याचबरोबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व प्रसूती पश्चात तांबी बसविणे या बाबींवरही मूल्यांकन करण्यात आले.

या यशात प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, आरसीएच कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सर्व स्टाफ तसेच आशा स्वयंसेविका यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या या कामगिरीने कोल्हापूरचा गौरव वाढवला असून, नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत आहे.