सिद्धनेर्लीतील महिलेनं दाखवला सोन्यासारखा प्रामाणिकपणा...!

कोल्हापूर - कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली गावात प्रामाणिकपणाचा एक उज्वल आणि प्रेरणादायी किस्सा घडला आहे. सिद्धेश्वर रोपवाटिकेतील महिला मजूर साधना बंडू मगदूम (रा. बामणी) यांची सव्वा दोन तोळे सोनं आणि महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी हरवली होती. ही पिशवी सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात विसरली गेली होती.
पिशवी ग्रामपंचायतीचे कर्मचारी दगडू कांबळे यांच्या पत्नी वासंती दगडू कांबळे यांना ती सापडली. त्यांनी कोणताही मोह न ठेवता, पिशवीतील कागदपत्रांवरून मालकाची ओळख पटवली आणि संपर्क साधून मगदूम यांना पिशवी परत केली. या अत्यंत प्रामाणिक कृतीबद्दल वासंती कांबळे यांचा सिद्धेश्वर रोपवाटिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या पिशवीमध्ये अंदाजे तीन लाख रुपये किमतीचं सोनं असल्याची माहिती आहे.यावेळी कॉ. शिवाजी मगदूम यांनी , “सध्याच्या काळात भ्रष्टाचार, फसवणूक, बेईमानीच्या घटनांचं प्रमाण वाढलेलं असतानाही वासंती कांबळे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा समाजासाठी आदर्श आहे.” असे सांगितले.
कार्यक्रमाला सिद्धेश्वर रोपवाटिकेचे प्रवीण पाटील, दत्ता लाड, रूपाली लाड, संभाजी मगदूम यांच्यासह रोपवाटिकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.