'ग्रीन डे' निमित्तानं मनपा प्रशासक मंजुलक्ष्मी यांची पायी आणि केएमटी बसनं कार्यालयात हजेरी...!
सार्वजनीक वाहतूकीचा वापर करण्याचा अनुभव

कोल्हापूर – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी ‘ग्रीन डे आणि अर्थ मिनिट’ हा उपक्रम राज्यभर राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश ऊर्जाबचत, पर्यावरणपूरक वाहतूक आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा प्रचार करण्याचा होता. या उपक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्वतः सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी आपल्या सासणे ग्राउंडजवळील शासकीय निवासस्थानापासून पायी चालत मध्यवर्ती बसस्थानक गाठलं. त्यानंतर केएमटी बसने प्रवास करत कार्यालयात दाखल झाल्या. बस प्रवासादरम्यान त्यांनी सामान्य प्रवाशांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि सार्वजनीक वाहतूकीचा वापर करण्याचा अनुभव शेअर केला. या उपक्रमाद्वारे त्यांनी "स्वतःहून कृती करून इतरांना प्रेरित करण्याचा" संदेश दिला. "पर्यावरणाचे रक्षण फक्त बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून होतो," हे त्यांनी आपल्या सहभागातून दाखवून दिलं.
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सायकल, चालणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरून कार्यालय गाठले. ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रण व आरोग्य संवर्धन यावर भर देवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.