मराठवाडा-विदर्भ पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५१ लाखांचे साहित्य रवाना

कोल्हापूर - मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. शनिवारी कोल्हापूरच्या मार्केट यार्ड येथून ५१ लाख रुपये किमतीचे धान्य व संसारोपयोगी साहित्य भरलेले १२ ट्रक मराठवाडा आणि विदर्भातील पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आले. या मदत उपक्रमावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकारकडून देखील पूरग्रस्तांसाठी भरघोस निधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल परास, राहुल पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, भरत पाटील भुयेकर, विकास पाटील, प्रवीणसिंह भोसले, नितीन दिंडे, सुहास जांभळे, माजी नगरसेवक संभाजी देवने, अब्दुल हजीहमीद मिरशिकारी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.