पूरग्रस्तांच्या मदतीचा पहिला ट्रक सोमवारी धाराशिवला रवाना होणार – आमदार सतेज पाटील यांचा पुढाकार

<p>पूरग्रस्तांच्या मदतीचा पहिला ट्रक सोमवारी धाराशिवला रवाना होणार – आमदार सतेज पाटील यांचा पुढाकार</p>

कोल्हापूर - धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा पहिला ट्रक उद्या सोमवारी (29 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता रवाना होणार आहे. खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत ही मदत रवाना करण्यात येणार असून कोल्हापूरकरांच्या दातृत्वातून ही मदत संकलित करण्यात आली आहे.


विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून "पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया" हा संकल्प राबवला जात आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून 24 सप्टेंबरपासून ही मदत संकलन सुरू असून, आज पाचव्या दिवशीही मदतीचा ओघ कायम आहे. आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला व संकलित मदतीचा आढावा घेतला. मदतीमध्ये धान्य, कपडे, किराणा, स्वच्छता साहित्य यांचा समावेश आहे. त्यांनी धान्य, जीवनावश्यक वस्तूंची किट्स, पॅकिंग व वाहतूक व्यवस्था यासंबंधी तपासणी करत काही सूचना दिल्या. मदतीचा पहिला ट्रक उद्या सोमवारी (29 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता रवाना होणार आहे. मदत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर काँग्रेसचे 25 कार्यकर्ते धाराशिवला जाणार आहेत. कोल्हापूर काँग्रेसच्या पुढाकारातून सुरू असलेली ही मदत मोहीम ही एक सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी उदाहरण ठरत असून, धाराशिवमधील पूरग्रस्तांना वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, कोल्हापूरकरांनी नेहमीप्रमाणे आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, असं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय.