आ. सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार पूरग्रस्तांसाठी दुसऱ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच...
मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले...

कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरकरांनी मदतीचा हात पुढं करावा, असं आवाहन केले आहे. या आवाहना नुसार काल २४ सप्टेंबर पासून कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात मदत साहित्य जमा करण्यात येत आहे. काल पहिल्या दिवशी मदत संकलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही दिवसभर मदतीचा ओघ सुरु होता.
कोल्हापूर शहर आणि परिसरातील गावांसह जिल्ह्याच्या विविध गावां मधून मदत घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज काँग्रेस कमिटी कार्यालयात येत होते. उचंगाव ग्रामपंचायत, कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांच्यासह खेबवडे ग्रामस्थ, वळीवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजू वळीवडे यांनी आज मदत जमा केलीय.
आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी ५ किलो तांदूळ, ५ किलो पीठ, एक किलो पोहे एक किलो गूळ, एक किलो तेल, एक किलो मसूर डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले एकशे एक कीट पूरग्रस्तांसाठी जमा केले आहेत.
उंचगांव ग्रामपंचायत, छत्रपती विकास सेवा सोसायटी, हनुमान पाणीपुरवठा संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले आहे. वळीवडेतील सामाजिक कार्यकर्ते राजू वळीवडे यांनीही जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा केलीय. मराठवाडयावर कोसळलेल्या अस्मानी संकटात कोल्हापूरकर ताकदीनं उभा राहतायत. आमदार सतेज पाटील यांच्या आवाहना नुसार अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत मदत संकलित करुन एकोणतीस सप्टेंबरला मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे.