“स्वच्छता ही सेवा 2025” अभियानाचा कोल्हापुरात महापालिकेच्या वतीने भव्य शुभारंभ

कोल्हापूर - केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान 2.0’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा 2025’ (Swachhata Hi Seva – SHS) अभियानाचा कोल्हापूर शहरात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका व धर्मादाय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू मिल परिसरात धर्मादाय प्रतिष्ठानच्या 500 सेवकांनी सकाळी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. मोहिमेदरम्यान 10 ग्रासकटर मशिनद्वारे तणकुटी काढण्यात आली. तर परिसरातील कचरा, प्लास्टिक इत्यादी एकत्र करून सुमारे 40 टन कचरा संकलित करण्यात आला. या उपक्रमात उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, शहर समन्वयक हेमंत काशीद, तसेच मेघराज चडचणकर, विकास भोसले, नंदकुमार पाटील, स्वप्नील उलपे, महेश भोसले, सुशांत कांबळे, सुरज घुणकीकर, विनोद नाईक, मुकादम व अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
✅स्वच्छता ही सेवा मोहिमेचा उद्देश -
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान देशभरात ही मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत स्वच्छता, पर्यावरण रक्षण, नागरिकांचा सहभाग आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व कल्याणावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात "स्वच्छता ही सेवा" अंतर्गत अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व त्यांचे परिवर्तन, सार्वजनिक जागांची स्वच्छता मोहिम, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे, स्वच्छ-हरित महोत्सव, स्वच्छता पुरस्कार योजना असे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, व्यवसायिक संकुले, बाजारपेठा, बस व रेल्वे स्थानके, तलाव, नद्या, उद्याने, धार्मिक स्थळे, अभयारण्ये, जलस्रोत, पर्यटनस्थळे व रस्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.