इचलकरंजीत पाणीबाणी.. नागरिकांची आंदोलनाची तयारी
इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर महिनाभरात निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी - शहरातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यास प्रशासन आणि शासन वारंवार टाळाटाळ करत असल्याचा आरोप इचलकरंजी नागरिक मंचने केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. २०२० साली शासन मान्य अमृत-२ योजनेतून शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, २०२२ पासून आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान ११ मार्च २०२५ रोजी आमदार राहुल आवाडे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र पाच महिने उलटले तरी यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाणीप्रश्नावर महिनाभरात निर्णय न झाल्यास पुन्हा जनआंदोलन उभारण्याचा इशारा मंचचे अभिजित पटवा यांनी दिलाय.
या पत्रकार बैठकीला उमेश पाटील, शितल मगदूम, सुहास पाटील, सुप्रिया माने, मीना कासार, रूपाली माळी, राजू कुन्नूर, विद्यासागर चराटे, राम आडके, अमोल ढवळे, राजू आरगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.