कुरुकलीत आगळंवेगळं गणेशमूर्ती पुनर्विसर्जन - पर्यावरणासाठी युवकांचा स्तुत्य उपक्रम

कागल – तालुक्यातील कुरुकली गावात छत्रपती शिवाजी कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळानं गणेश विसर्जनानंतर एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवलाय. वेदगंगा नदीकाठावर वाहून आलेल्या १५० पेक्षा अधिक घरगुती गणेशमूर्तींना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळीच्या साहाय्यानं सुरक्षितपणे खोल पाण्यात पुनर्विसर्जित केलं. शिवाय नदीत टाकलेलं निर्माल्य, फोटो फ्रेम्स, लोखंडी संरचना, काचा इ. साहित्य कार्यकर्त्यांनी बाहेर काढलं. यामुळे मूर्तींची विटंबना टळली आणि जलप्रदूषणावर आळा बसला. नदीकाठाची स्वच्छता करून परिसर सुंदर करण्यात आला. १४ सप्टेंबर रोजी सकाळी गावातील अनेक तरुणांनी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभाग नोंदवला. गणेशोत्सवात भक्तिभावाशिवाय सामाजिक आणि नैतिक जबाबदारी देखील महत्त्वाची असते, हे या तरुणांनी कृतीतून दाखवून दिलं. गावकऱ्यांमध्ये या उपक्रमाचं प्रचंड कौतुक होत असून इतर गावांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होतीय.
उपक्रमात विकासराव हंबीरराव पाटील, माजी सरपंच बाळासो आनंदा पाटील, अमित बंडासो कांबळे, तानाजी दिनकर पाटील, दयानंद धोंडीराम कुंभार, संतोष कृष्णा पाटील, विनायक प्रकाश कुंभार, गणेश जोतीराम पाटील, आदित्य महेश पाटील, मृणाल विलास पाटील, विजय नेताजी पाटील, प्रकाश महादेव दाभोळे यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते.