रस्त्यांचे संरक्षण करत प्रिन्स क्लबची अनोखी ‘अंतराळी होळी’

<p>रस्त्यांचे संरक्षण करत प्रिन्स क्लबची अनोखी ‘अंतराळी होळी’</p>

कोल्हापूर : परंपरा जपत सामाजिक जाणीव जपणारा उपक्रम मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब खासबाग यांच्या वतीने राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही क्लबतर्फे ‘अंतराळी होळी’ साजरी करण्यात आली.
डांबरी रस्त्यावर होळी पेटविल्याने रस्त्यांचे नुकसान होते आणि आधीच दयनीय अवस्थेत असलेल्या रस्त्यांची अधिक हानी होते. याची जाणीव ठेवत प्रिन्स क्लबने जमिनीपासून सुमारे अडीच फूट उंच स्टॅन्ड उभारून त्यावर केवळ ५१ शेण्या रचून होळी प्रज्वलित केली. त्यामुळे रस्त्याचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्यात आला.


शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. एक वेळ रस्ता तयार होण्यासाठी नागरिकांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागते, साधे पॅचवर्कही वेळेवर होत नाही. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सणाचा आनंद घेतानाच सामाजिक बांधिलकी जपत क्लबच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमी येथील दानपेटीत १००१ रुपयांची देणगी देण्यात आली.

या उपक्रमाचे नियोजन संदीप पोवार, संजय राऊत, अभिजीत पोवार, सचिन साबळे, स्वप्निल पोवार, ज्ञानेश माळी, अशोक पोवार, आदित्य चौगुले आदी कार्यकर्त्यांनी केले. नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत इतर मंडळांनीही अशा प्रकारे पर्यावरणपूरक आणि जबाबदारीची होळी साजरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.