कोल्हापुरात ‘या’ मोक्याच्या ठिकाणी वाहतेय गटारगंगा
कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील बाबुभाई परीख पुलाखालून गटारगंगा वाहू लागलीय. या दुर्गंधीयुक्त गटारगंगेतून कसरत करत नागरिक ये – जा करत आहेत. या रस्त्यावरच असलेले वाहनतळ आणि दुकानांच्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच शहरातील बस स्थानकाजवळील बाबुभाई परीख पुलाखालील रस्त्यावरुन वाहणाऱ्या गटारीतूनच लोकांना ये - जा करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून याठिकाणी रस्ता तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये - जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारक आणि पादचाऱ्यांना कामावर जात असताना गेल्या दोन - तीन दिवसांपासून गटारीच्या पाण्यातून तारेवरची कसरत करत जावे लागतं आहे. या रस्त्यावर चारचाकी वाहनांना परवानगी नसताना देखील येथे चार चाकी वाहनांची वर्दळ कायम आहे. रिक्षा आणि चारचाकी वाहनामुळं सर्वांना या गर्दीतून थांबत थांबत वाट काढावी लागतीय, एरवी महापालिका रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास तत्पर असते मग शहरातील या मोक्याच्या ठिकाणावरील अतिक्रमण काढण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष का ?, डोळे असूनही महापालिका आंधळेपणाचं आव का आणतीय, असा संतप्त सवाल वाहनधारकांसह पादचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.