ग्रामीण जीवनाच्या विविध छटा दाखवणारं गावगाडा हे छायाचित्र प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात सुरू
कोल्हापूर - कलाकार अतुल भालबर आणि स्मिता कुंभार यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं 'गावगाडा' हे प्रदर्शन कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सुरूय. मराठमोळ्या संस्कृतीला आणि मराठी परंपरेला केंद्रस्थानी ठेवत ग्रामीण भागातल्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील विविध छटा या छायाचित्रांमधून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. जीवनातील रोजचे संघर्ष, कष्टाचं जगणं आणि माणुसकीचे बारकावे वास्तववादी पद्धतीनं टिपून त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आलाय.
या प्रदर्शनात म्हैशी चरायला नेणं, मातीच्या विटा तयार करणं, टायर फिरवणं, नख्ख काढणं शिडीवर लोंबकळणं, भाकरी करणं, दाढी करणं, दळप दळणं, बैलाच्या पायाचे नाल काढणं, भात कापणी यांसह ग्रामीण जीवनाशी संबंधित अनेक विषयांवरील बोलकी छायाचित्रं मांडण्यात आलीयेत .
प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळच एक 'आय कॉन्टॅक्ट' फोटो लावण्यात आलाय. यातील बाळ आपल्याकडंच पहात असल्याचा भास निर्माण करणारी ही कलाकृती विशेष लक्ष वेधून घेत आहे. ग्रामीण जीवनाच्या विविध छटा दाखवणारी अनेक छायाचित्रं या प्रदर्शनात पाहायला मिळत असून, हे प्रदर्शन बारा जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असं आवाहन कलाकार स्मिता कुंभार आणि अतुल भालबर यांनी केलंय.