मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये संत साहित्याचे अतुलनीय योगदान : डॉ. सतीश बडवे
कोल्हापूर - मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये संतसाहित्याचे अतुलनीय योगदान आहे. समाजातील सर्व स्तरांतील घटकांच्या भाषेचे प्रतिबिंब त्यामध्ये पडले आहे. समकाळातील विचारांच्या मर्यादा ओलांडून संतवाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी, व्याप्ती आणि समज वाढविण्याची मोठी गरज निर्माण झाली , असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलन अनुदानातून येथील भाषाविकास संशोधन संस्था आणि शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकोबारायांना समर्पित ‘संत साहित्य संमेलन-२०२५’च्या संमेलनाध्यक्ष पदावरुन ते बोलत होते.
उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे आणि प्रा. प्रवीण बांदेकर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. बडवे म्हणाले, संतांनी आणि त्यांच्या साहित्याने समाजाविषयीचे भान सातत्याने जागे ठेवण्याचे काम केले. भक्तीच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी असल्याचे सांगणारा आणि प्रदान करणारा वारकरी संप्रदाय आहे. संतसाहित्याने समाजपरिवर्तनाची हाक देत असताना सामाजिक उत्थानासाठीचा विचार सतत मांडला. रंजल्या-गांजल्यांना उराशी पकडून त्यांच्यामध्ये उत्थानाची आस निर्माण करीत समग्र समाजामध्ये नैतिकतेची शिकवण प्रवाहित केली.
यावेळी डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. प्रवीण बांदेकर, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. अवनिश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अरूण शिंदे, अरुण जाधव यांच्यासह शिक्षक, संत साहित्याचे अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते